पुणे शहर: अल्पवयीन मुलांना वाहन दिल्यास होणार कठोर कारवाई, वाचा सविस्तर
पुणे : ‘अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना व वाहतुकीचे नियम मोडताना पकडल्यास त्याच्याकडील वाहन एक वर्षासाठी रस्त्यावर उतरवू दिले जाणार नाही. तसेच त्याला वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत वाहन परवानाही दिला जाणार नाही,’ अशी माहिती अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवून दोघांना उडविले होते. हा गंभीर प्रकार ताजा असताना अपघातानंतर पालकांनी काही धडा घेतला का नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या विशेष मोहिमेत ११ अल्पवयीन मुले वाहन चालविताना सापडली होती.
ते चालवत असलेल्या वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. दि. ९ जुलै रोजी वाहतूक पोलिसांच्या विशेष मोहिमेत अल्पवयीन मुले चालवीत असलेली वाहने आणि परवाने नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
आता अल्पवयीन मुलांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनाला एक वर्षासाठी रस्त्यावर येऊ दिले जाणार नाही. तसे हमीपत्रच संबंधित पाल्याकडून व पालकांकडून लिहून घेतले जाणार आहे. अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्याची व वाहतूक नियम मोडल्याची माहिती आरटीओला कळवली जाणार आहे. एक वर्षासाठी वाहन रस्त्यावर बंदी असल्याच्या कालावधीत वाहन रस्त्यावर उतरवले गेल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.