पुण्यासाठी पुढचे दोन दिवस महत्वाचे; हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट; वाचा सविस्तर

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात पावसाचे थैमान सुरू असून, हवामान विभागाने येत्या 20 व 21 सप्टेंबरसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी (दि. 18) दुपारनंतर मुसळधार पावसाने पुणेकरांना अक्षरशः झोडपले. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. त्यानंतर शुक्रवारी (दि. 19) पहाटे शहरातील अनेक भागांत पावसाचा धबधबा कोसळला.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, कमी दाबाचा पट्टा, दमट हवामान आणि वेगाने वाहणारे वारे या कारणांमुळे पावसाची तीव्रता वाढली आहे.
पावसाची नोंद (शुक्रवार पहाटेपर्यंत):
पाषाण : 140 मि.मी
शिवाजीनगर : 97 मि.मी
कुरवंडे : 68.5 मि.मी
लवळे : 54.5 मि.मी
चिंचवड : 44 मि.मी
हडपसर : 37.5 मि.मी
माळिन व मगरपट्टा : 29 मि.मी
हवेली व डुडुळगाव : 20.5 मि.मी
राजगुरुनगर : 7.5 मि.मी
दापोडी : 6 मि.मी
बारामती : 5.8 मि.मी
निमगिरी : 4.5 मि.मी
दौंड : 1.5 मि.मी
तळेगाव : 1 मि.मी
दरम्यान, शुक्रवारी सकाळी शहरात ढगाळ वातावरण होते. काही भागांत अधूनमधून सूर्याचे दर्शन झाले, तर दुपारनंतर कात्रजसह इतर भागांत पुन्हा पाऊस बरसला. संध्याकाळपर्यंत पुणे येथे 0.1 मि.मी, पाषाण 1 मि.मी, चिंचवड 6 मि.मी तर लवळे येथे 10.5 मि.मी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने पुणेकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
—