निवडणूक झाली.. सरसकट लाडक्या बहिणींचा रुबाब संपणार! पाच अटी पाळणाऱ्या बहिणींनाच मिळणार २१०० रुपये?
15 ऑक्टोबर पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांना सरसकट प्रति महिना दीड हजार रुपये मिळाले. यासाठी काही बंधने व मर्यादा आणि अटी सरकारने घालून दिल्या होत्या परंतु आचारसंहितेच्या काळापर्यंत केवळ तीन महिन्यांमध्ये अर्ज केलेल्या अडीच कोटी महिलांच्या अर्जाची पडताळणी करणे शक्य नव्हते अशी सबब सांगत आता सरकारने पाच अटी पाळणाऱ्या बहिणींनाच येत्या एक एप्रिल पासून प्रति महिना 2100 रुपये मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
अर्थात यास सरकारने अजून दुजोरा दिला नसला तरी, सरकारी स्तरावर सुरू असलेल्या हालचालीनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, घरातील चारचाकी वाहन, पाच एकरपेक्षा अधिक जमीन नसावी, एकाच लाभार्थ्यांनी दुसऱ्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले नसावेत या पाच अटी काटेकोरपणे तपासल्या जाणार आहेत. या अटीमधून पात्र असलेल्या महिलांनाच आता मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा योजना जाहीर केल्या होत्या. यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय झाली. अर्थात अर्ज करेल त्याला हे पैसे मिळाले. मात्र आता तो सरसकट लाड बंद होणार आहे. आता त्यासाठी कारण देताना आचारसंहितेदरम्यानच्या तीन महिन्याच्या काळात कोट्यावधी अर्जांची छाननी शक्य नव्हती असे कारण पुढे करण्यात आले आहे.
राज्यातील सध्या लाभ मिळत असलेल्या अडीच कोटीहून अधिक महिलांना जर 21 रुपयांचा दरमहा हप्ता देण्याचे ठरले, तर राज्य शासनाला दरवर्षी 53 हजार कोटी रुपये लागू शकतात. राज्याच्या तिजोरीवरचा भार लक्षात घेता, पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी काटेकोर पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यातून ही संख्या एक कोटीपर्यंत खाली येऊ शकते असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.