पुणे : महापालिकेत दहा कोटींचा कंत्राट मिळवण्यावरून वाद; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले
पुणे : महापालिकेतील कामाच्या ठेक्याच्या वादातून एका ठेकेदाराला पिस्तूल दाखवून धमकावण्यात आले, अशी घटना गंज पेठेत घडली. या प्रकरणात रविवारी रात्री खडक पोलिस ठाण्यात मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेकेदार निर्मल मोतीलाल हरिहर (वय ३६, रा. गंज पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल केलेले संशयित आहेत कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते (वय ३७) आणि महेश राजेंद्र गिते (वय ३५, दोघे रा. भवानी पेठ).
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या माहितीनुसार, ठेकेदार निर्मल हरिहर रविवारी दुपारी गंज पेठेतील घराजवळ थांबले असताना गणेश गिते आणि त्याचा भाऊ महेश तेथे आले.
निर्मल हरिहर यांना ११ कोटींचे कंत्राट मिळाले होते, परंतु ते कंत्राट घेऊ नये यासाठी त्यांना पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, असे हरिहर यांनी तक्रारीत म्हटले आहे. माहिती मिळाल्यावर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष खेतमाळस यांनी घटनास्थळी धाव घेतली.