हिवाळ्यात तब्येतीची काळजी घ्या! सर्दी-खोकला, फ्लूचा धोका वाढला; महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पुणे : शहरात हिवाळ्याची चाहूल लागताच हवेत गारवा वाढला आहे. याचबरोबर सर्दी, खोकला, ताप, फ्लू, अस्थमा, सायनस, हृदयविकार आणि संधिवात अशा आजारांचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आणि आरोग्यसूचना पाळण्याचे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले की, थंडीच्या दिवसांत नागरिकांनी उबदार कपडे घालावेत, गरम अन्न आणि पेय घ्यावीत तसेच थंड पदार्थ टाळावेत. आहारात हंगामी फळे, भाज्या, सुका मेवा, गूळ आणि तीळ यांचा समावेश करावा. पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवणेही आरोग्यासाठी अत्यावश्यक असल्याचे महापालिकेचे मत आहे.
स्वच्छतेचे नियम पाळा!
हिवाळ्यात संसर्गजन्य आजार पसरू नयेत म्हणून हात वारंवार धुणे, खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्वचेच्या कोरडेपणासाठी तेल किंवा मॉइश्चरायझरचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.
लहान मुले आणि वृद्धांनी घ्यावी विशेष काळजी
महापालिकेने सूचित केले आहे की, वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला, लहान मुले आणि दीर्घकालीन आजार असलेल्या नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी.
सर्दी, खोकला, ताप, फ्लू किंवा श्वसनाच्या तक्रारी असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
फ्लूची लस डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी
फ्लू अथवा इन्फ्लूएंझा लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषध घेऊ नये. ताप, श्वास घेण्यास त्रास, त्वचा किंवा ओठ निळसर होणे, थुकीत रक्त दिसणे, किंवा लहान मुलांनी अन्न व द्रव घेण्यास नकार दिल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की,
“हिवाळ्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या साध्या पण महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी.”
—