पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी कडक बंदोबस्त; १२ हजार पोलीस तैनात; मतदान व मतमोजणीदरम्यान शहरावर कडक नजर
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात येत्या गुरुवारी (दि. १५ जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार असून, शांततापूर्ण आणि सुरळीत मतदानासाठी तब्बल १२ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी (दि. १६ जानेवारी) होणाऱ्या मतमोजणीदरम्यानही शहरात तसेच मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था राहणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुणे शहर आणि उपनगरात एकूण ३ हजार ९८३ मतदान केंद्रे (बूथ) असून, प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी तैनात असणार आहे. शहरातील ९१३ इमारतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार असून, प्रत्येक इमारतीत दोन पोलीस कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. मतदान केंद्रांच्या परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांकडून नियमित गस्त घालण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तासह गुन्हे शाखेची विशेष पथके, शीघ्र कृती दलाची आठ पथके तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. मतदानादरम्यान शहरातील सर्व हालचालींवर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवणार असून, कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलीस कारवाई केली जाणार आहे.
बंदोबस्ताचा तपशील
पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त
अतिरिक्त पोलीस आयुक्त – ४
पोलीस उपायुक्त – १४
पोलीस अधिकारी व कर्मचारी – ७ हजार
गृहरक्षक दलाचे जवान – ३ हजार
बाहेरील बंदोबस्त – १,५०० पोलीस कर्मचारी
दुचाकी गस्त – ५०० पोलीस कर्मचारी
हा संपूर्ण बंदोबस्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पंकज देशमुख आणि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आला आहे.
महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
—