पुण्यात ‘स्पा रॅकेट’चा पर्दाफाश; त्रिकुटावर ‘मकोका’ची कारवाई? पोलिस आयुक्तांचा खुलेआम इशारा; गुन्हेगारी जाळे उद्ध्वस्त करणाऱ्याला बक्षीस

पुणे प्रतिनिधी –
शहरात ‘स्पा’च्या आडून सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाच्या वाढत्या साखळीमुळे अखेर पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे. ‘धनराज’, ‘प्रिया’ आणि ‘अनुज’ या त्रिकुटाविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्याचे खुले आव्हानच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. या टोळीविरुद्ध ठोस कारवाई करणाऱ्या पोलिस उपायुक्त आणि वरिष्ठ निरीक्षकाला थेट बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
‘स्पा’च्या आडून वेश्याव्यवसायाची मोठी साखळी
शहरात सध्या शंभरहून अधिक स्पा सेंटरच्या माध्यमातून ही टोळी वेश्या व्यवसायाचे जाळे पसरवत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, या साखळीचे खरे सूत्रधार आजही पोलिसांच्या टप्प्याबाहेरच आहेत. आतापर्यंत केवळ व्यवस्थापकांवरच कारवाई झाली असून, मुख्य आरोपी मोकाटच आहेत.
व्यवस्थापक अडकतात, सूत्रधार मोकाट
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे त्रिकुट व्यवस्थापनावर सर्व जबाबदारी टाकते. बाहेरून आणलेले व्यवस्थापक पकडले जातात, मात्र मालक मोकळे राहतात. विशेष म्हणजे, अलीकडेच विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी वेश्या व्यवसायात सापडली होती. ही घटना गंभीर स्वरूपाची असून पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
निवडक आणि प्रभावहीन कारवाया
सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत फक्त निवडक आणि फुटकळ कारवायाच झाल्या आहेत. गुन्हेगारांवर थेट गुन्हेदेखील दाखल झालेले नाहीत. मागील वर्षी सामाजिक सुरक्षा विभाग बंद करून ‘मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग’ सुरू करण्यात आला होता. पण ठोस यश न आल्याने जुने स्पा पुन्हा कार्यरत झाले आहेत.
जाहिर जाहिराती, पोलिसांचा ‘मौन’
‘बॉडी स्पा’, ‘थाई मसाज’, ‘रिलॅक्सेशन सेंटर’ अशा नावाने सोशल मिडियावर जाहिराती करून खुलेआम ग्राहकांना आकर्षित केले जाते. याकडे पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, हा प्रश्न उभा राहिला आहे.
आयुक्तांचा इशारा – आता थेट मकोका
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “या त्रिकुटाविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे. जो अधिकारी या गुन्हेगारी जाळ्यावर घाव घालेल, त्याला थेट बक्षीस दिले जाईल,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
पुणे पोलिसांसमोर आता कसोटी
या त्रिकुटाविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई होईल का, की नेहमीप्रमाणेच हे प्रकरणही धूळखात जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता शहरवासीयांचे आणि महिला संघटनांचे लक्ष पोलिसांच्या पुढील पावलांकडे लागले आहे.