सोलापूर : पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या; पोलिसांत हळहळ

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश ज्योतीराम पाडुळे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या अचानक मृत्युमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महेश पाडुळे हे सोलापूर ग्रामीण मुख्यालयात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली वैराग येथे झाल्याने ते आपल्या कुटुंबासोबत तिथे वास्तव्यास होते. प्राथमिक माहितीनुसार, ड्युटी संपवून घरी आल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेश पाडुळे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. ते कोणत्या तणावाखाली होते का, याचा शोध घेतला जात आहे.
वैराग पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा अधिक तपास करत असून पाडुळे यांच्या मृत्यूसंदर्भात पोलीस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.