कृषी विभागाची धडाकेबाज कारवाई; बोर्गीत बंदी असलेले कीटकनाशक जप्त

IMG-20241005-WA0020.jpg

जत: बोर्गी बुद्रक येथील बसवेश्वर कृषी सेवा केंद्रात कृषी विभागाने मोठी कारवाई केली असून, बंदी असलेल्या नायट्रो बेंझिन २०% कीटकनाशकाच्या १६० बाटल्या जप्त केल्या आहेत. या छाप्यात सुमारे ९२ हजार ६३० रुपयांचा कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी संतोष चौधरी आणि तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी केली. २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा छापा टाकण्यात आला.

कृषी केंद्राचे मालक विनोद कुमार सोमनिंग हलकुडे यांच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कारण त्यांनी बंदी असलेल्या औषधाची जाणीवपूर्वक विक्री केली. गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित विभागाने आवश्यक तपासणी केली.

कृषी केंद्राच्या तपासणीत नायट्रो बेंझिन कीटकनाशकाच्या बाटल्या आढळून आल्या, परंतु कृषी केंद्राचे मालक हलकुडे यांच्याकडे उत्पादनाचे प्रमाणपत्र आणि विक्री परवाना उपलब्ध नव्हता.

याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर संबंधित कंपनी यूएस क्रॉप केअर पंचवटी नाशिकच्या उत्पादनाच्या परवान्याबद्दलची पुष्टी प्राप्त झाली की, या कंपनीला महाराष्ट्रात कीटकनाशक निर्मिती व विक्रीचा परवाना नाही. यामुळे कीटकनाशक कायदा १९६८ व १९७१ मधील तरतुदींचा भंग झाल्याने हलकुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईने कृषी क्षेत्रात खळबळ माजली आहे.

Spread the love

You may have missed