पुण्यात रात्रीच्या पब पार्ट्यांवर निर्बंध; वेळेचे उल्लंघन केल्यास कारवाई; ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टपूर्वी पोलिसांचा पब चालकांना इशारा

660620.webp

पुणे : शहरातील पब आणि हॉटेल व्यवसायातील बेशिस्त आणि नियमभंग करणाऱ्या चालकांना आवर घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री १.३० वाजेनंतर पब सुरू ठेवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

“कॉफी विथ सीपी” कार्यक्रमात स्पष्ट भूमिका
पोलीस आरोग्य मित्र फाऊंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळ आयोजित “कॉफी विथ सीपी” या कार्यक्रमात बोलताना आयुक्तांनी ही भूमिका मांडली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि आगामी ख्रिसमस-थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

पब संस्कृतीवर विरोध नाही, पण निर्बंध गरजेचे
“पुणे पोलीस पब संस्कृतीविरोधात नाहीत. ती सध्याच्या मनोरंजनाची साधनं आहेत. पण, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब चालकांवर कारवाई होणार आहे,” असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

पॉर्श कार केसनंतर पबवर लक्ष
पॉर्श कार प्रकरणानंतर पुण्यातील अनेक अवैध पब आणि हॉटेल्स महापालिकेच्या रडारवर आले. त्यात कोरेगाव परिसरातील पब आणि कॉझी बारवरही कारवाई करण्यात आली होती. यानंतर नागरिकांमध्ये पब व्यवसायांबाबत चर्चेला वेग आला आहे.

हॉस्टेलसाठीही नवे नियम
पुण्यातील काही हॉस्टेलही पोलिसांच्या रडारवर आहेत. एका फ्रेशर पार्टीत घडलेल्या घटनांनंतर हॉस्टेल व्यवस्थापनासाठी नवीन नियमावली तयार करण्याचा विचार सुरू असल्याचं आयुक्तांनी जाहीर केलं.

आर्थिक दंडाचा इशारा
“रात्री १.३० नंतर पब सुरू राहिले तर फक्त कारवाईच नाही, तर आर्थिक दंडही ठोठावला जाईल,” असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे पब आणि हॉटेल चालकांना आता नियमांचं पालन करणं भाग आहे.

पुण्यातील हा निर्णय पब चालकांसाठी धडा ठरणार असल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी पोलिसांचा प्रयत्नही दिसून येतो.

Spread the love