रेशनचा गहू की विष? केस गळती प्रकरणाचा धक्कादायक तपास; सरकारने गोदामे केली सील

बुलढाणा: शेगाव आणि नांदुरा तालुक्यात वाढलेल्या रहस्यमय केस गळतीच्या घटनांनी जिल्ह्यासह संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष वेधून घेतले होते. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना, या घटनांमागील खरे कारण आता उघडकीस आले आहे. रेशन दुकानांमार्फत वितरित झालेल्या गव्हामध्ये विषारी घटक असल्याने “टक्कल व्हायरस”चा प्रसार झाल्याचे समोर आले आहे.
बुलढाण्यातील काही गावांमध्ये अनेक नागरिकांच्या डोक्यावरील केस झपाट्याने गळू लागले होते. काहींनी दूषित पाणी हे यामागील कारण असल्याचा संशय व्यक्त केला होता, तर काहींनी इतर संभाव्य कारणांचा शोध घेतला. मात्र, या संपूर्ण घटनेचा तपास करत असताना संशोधक हिम्मतराव बावस्कर यांनी गव्हातील प्रचंड प्रमाणातील सेलेनियम हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट केले.
गुप्तता पाळत सरकारची तातडीची कारवाई
या घटनेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने आरोग्य तज्ज्ञांचे विशेष पथक बुलढाणा जिल्ह्यात पाठवले होते. तपासाअंती, रेशनच्या गव्हामुळेच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने त्वरीत पावले उचलली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील रेशन गोदामांना कुलूप ठोकण्यात आले असून, या प्रकरणाचा थेट संबंध पंजाब आणि हरियाणातील धान्य पुरवठ्याशी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणावर सरकारकडूनही गुप्तता बाळगली जात असून, पुढील चौकशीसाठी विशेष पथक कार्यरत आहे. रेशन धान्यात अशा प्रकारे विषारी घटकांचा समावेश कसा झाला आणि त्याला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.