लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांची टीका: ‘ही योजना दीर्घकाळ टिकणार नाही’ वाचा सविस्तर
सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे, आणि योजनेचे पहिले दोन हफ्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत.
या योजनेवर राज ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर दौऱ्यावर असताना, एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल आपले मत मांडले. ते म्हणाले की, या योजनेमुळे महायुती सरकारला निश्चितपणे मतदान मिळेल असे म्हणता येणार नाही. त्यांच्या मते, ही योजना जास्त काळ टिकणार नाही आणि येत्या दोन ते तीन महिन्यांतच बंद होऊ शकते.
सरकारकडे योजनेसाठी आवश्यक तेवढे पैसे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांना फुकटचे पैसे नकोत; त्यांना रोजगाराची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना फुकटची वीज नको, तर अखंडित वीजपुरवठा पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, सरकारने जे पैसे दिले आहेत, ते लोकांनी भरलेल्या करातून आलेले आहेत. राज्यात असंख्य नोकऱ्या उपलब्ध आहेत, पण त्यांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचत नाही. लोक पैसे घेऊनही मतदान करत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. पैसे घेतल्यावर कोणी कोणाला मतदान केले, हे कसे कळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.