पुणे: येरवडा परिसर अंधारात; पथदिवे बंद, नागरिक त्रस्त
“वेळीच दुरुस्ती न झाल्यास आंदोलन” – सामाजिक कार्यकर्ते नौशाद शेख यांचा इशारा
पुणे : येरवडा येथील विक्रीकर भवन समोरील मुख्य रस्ता गेल्या २० ते २५ दिवसांपासून अक्षरशः अंधारात बुडालेला आहे. परिसरातील आठ ते दहा पथदिवे बंद असून काही ठिकाणी असलेले दिवे केवळ नावापुरतेच चालू आहेत. त्यामुळे परिसरात संध्याकाळनंतर दाट अंधार पसरतो आणि पादचारी तसेच वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
पहा व्हिडिओ
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर प्रकाशाचा अभाव असल्याने दररोज अपघातासारखे प्रसंग टळत आहेत. “अशा परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना घडल्यास जबाबदारी कोणाची?” असा संतप्त प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते नौशाद शेख यांनी सांगितले की, “या भागातील पाच ते सहा खांबांवरील एलईडी दिवे चोरीला गेले असून, काही दिव्यांचा प्रकाश जमिनीवर पडत नाही. प्रशासनाकडून तातडीने लक्ष दिले गेले नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते.”
शेख यांनी संबंधित विद्युत विभागाला त्वरीत पथदिव्यांची दुरुस्ती करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, “जर दिवे लवकरच सुरू करण्यात आले नाहीत, तर नगर रोड क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या असून, आता प्रशासनाची कारवाई कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.