पुणे: हुक्का पार्लरवर वानवडी पोलिसांचा छापा; हॉटेल चालकासह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. 13: साळुंखे विहार रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये अवैधरित्या चालविण्यात येणाऱ्या हुक्का पार्लरचा पर्दाफाश करत वानवडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शनिवारी (दि. 10) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, हॉटेल चालकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत 3 हजार 215 रुपयांचा हुक्कासंबंधीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे नारायण मगर थापा (33, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), चंदनकुमार श्रीतेवन राय (22, रा. दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अँड क्लाऊड किचन, साळुंखे विहार रोड), इनायत मजिद सल्ला (52, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) आणि जावेद मलिक शेख (42, रा. गोळीबार मैदान, कॅम्प) अशी आहेत.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनुसार अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांत सतत गस्त आणि तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे आणि त्यांच्या पथकातील अमोल पिलाणे व अभिजित चव्हाण यांना हुक्का पार्लरबाबत खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर तातडीने ‘दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अँड क्लाऊड किचन’ येथे छापा टाकण्यात आला. पोलिसांनी तिथे अवैधरित्या हुक्का पार्लर चालविल्याचे उघड केले.
या प्रकरणी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 अंतर्गत कलम 4-अ व 21-अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, गुन्हे निरीक्षक गोविंद जाधव आणि त्यांचे पथक – उपनिरीक्षक टोणे, पोलीस हवालदार पिलाणे, चव्हाण, गायकवाड, वाघमारे, मदने, सुतार, भोसले, शेगर आणि कांबळे – यांनी केली.