पुणे: विमाननगर – ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा, चौघांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे, विमाननगर – लोटस ३६५ (Lotus365) या बंदी घालण्यात आलेल्या ऑनलाईन जुगार साइटवरून जुगार चालवणाऱ्या टोळीवर विमानतळ पोलिसांनी छापा टाकत चार जणांना अटक केली. या कारवाईत १२ मोबाईल, २ लॅपटॉप आणि १ टॅब असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये विशाल श्रीधर राख (वय २६), समाधान उद्धव शिरसाट (वय २०), सौरभ नवनाथ राख (वय २१), आणि महेश पांडुरंग शिरसाट (वय २६) यांचा समावेश आहे. हे सर्वजण लोहगावमधील वृंदावन बिल्डिंग येथे राहतात.
जुगाराचा पर्दाफाश
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, वृंदावन बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये विना परवाना ऑनलाईन जुगार खेळवला जात असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता छापा टाकून या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला.
गिऱ्हाईकांची आर्थिक फसवणूक
ऑनलाईन जुगार खेळवण्यासाठी बँक खाते व सिमकार्डचा गैरवापर करून ग्राहकांकडून पैसे घेण्यात येत होते. त्यानंतर लोटस ३६५ वेबसाईटच्या माध्यमातून जुगार खेळवला जात होता. या प्रकरणात संबंधित ग्राहकांची तसेच शासनाची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
अधिक तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
शासनाने घेतली कठोर भूमिका
ऑनलाईन जुगारामुळे अनेक तरुण आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडत असल्याने शासनाने अशा प्रकारच्या जुगारांवर बंदी घातली आहे. मात्र, अशा बेकायदेशीर अड्ड्यांवर पोलिसांनी अधिक लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही मत व्यक्त करण्यात येत आहे.