पुणे: उरुळी कांचन पोलिसांची कारवाई; सहा जण फरार, 1.67 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, २५ मे : हवेली तालुक्यातील पेठ (ता. हवेली) गावात दादा आढाव यांच्या शेताजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १ लाख ६७ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनास्थळावरून सहा अनोळखी इसम फरार झाले.
ही कारवाई रविवारी (ता. २५) मध्यरात्री दीड वाजता करण्यात आली. उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुमित वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच संशयितांनी पळ काढला.
घटनास्थळी तपासणी केली असता, जुगारासाठी वापरण्यात आलेली रोख रक्कम, ५२ पत्ते, एक लाकडी टेबल, एक प्लास्टिक टेबल, सहा प्लास्टिक खुर्च्या तसेच चार मोटारसायकली (हिरो स्प्लेंडर, होंडा ॲक्टिवा, हीरो पॅशन) असा एकूण १ लाख ६७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६१/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे करत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.