पुणे: दारासमोर विनापरवाना भाजी विक्रीमुळे नागरिक हैराण; कारवाईची मागणी

पुणे – येरवडा परिसरातील कामराज नगर येथील रहिवासी आकाश वायदंडे यांनी आपल्या घरासमोर अवैधरित्या सुरू असलेल्या भाजी विक्रीविरोधात पुणे महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली आहे. या विक्रेत्या महिलेने कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर व्यवसाय सुरू केल्यामुळे परिसरात गर्दीचा त्रास आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे, असा आरोप वायदंडे यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, सदर महिला दररोज सकाळपासूनच घरासमोरच आपला गाडा लावून भाजी विक्री सुरू करते. यामुळे घरासमोरील मार्ग अडवला जात असून, रहिवाशांना घरातून बाहेर पडताना अडथळा निर्माण होतो. याशिवाय, भाजी विक्रीनंतर उरलेला कचरा तिने रस्त्यावर आणि अनेकदा घराच्या दरवाजासमोरच टाकल्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण झाली आहे.
आकाश वायदंडे हे लहुजी शक्ती सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष असून, त्यांनी यासंदर्भात दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी येरवडा क्षेत्रीय कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे. महानगरपालिकेने यावर तत्काळ लक्ष देत सदर अवैध व्यवसायावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही या वाढत्या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली असून, सार्वजनिक रस्त्यांचा अडथळा दूर करण्यासाठी आणि परिसरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.