पुणे : अनधिकृत जाहिरात फलकाचे लोखंडी सांगाडे जैसे थे; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
पुणे : अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केल्यानंतरही काही ठिकाणी धोकादायक सांगाडे तसेच राहिले आहेत, त्यांना तात्काळ दूर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या क्षेत्रांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गांवर धोकादायक सांगाडे उभे आहेत. या लोखंडी सांगाड्यांवर कारवाई होईल का, अशी चर्चा पूर्व हवेलीमध्ये सुरू झाली आहे. काही ठिकाणी जुन्या इमारती आणि पूरप्रवण क्षेत्रांमध्ये अडचणींची माहिती घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले.जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन बैठकीत डॉ. दिवसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते. पुणे-सोलापूर महामार्गावर बेकायदेशीर फ्लेक्स व होर्डिंग्ज लावलेली आहेत, ज्यामुळे प्रवासी आणि पादचारी यांच्या जीवितास धोका आहे. हडपसर ते सोलापूर मार्गावर लावलेल्या अनधिकृत फ्लेक्सना जानेवारी 2024 मध्ये काढले होते, पण एनएचआयचे काम पुढे जाताच पुन्हा अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आले. त्यामुळे या मार्गावर पुनः धोकादायक होर्डिंग्ज आल्या आहेत. प्रशासनाकडून फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत. अनधिकृत जाहिरातींना बंदी असूनही धोकादायकरित्या पोल उभारले जात आहेत. काही ठिकाणी पथदिव्यांच्या खांबांवर जाहिराती लावण्यात आल्या आहेत, परंतु कारवाईच्या नावाखाली फक्त कागदी घोडे नाचवले जात आहेत. हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक अनधिकृत होर्डिंग्ज धोकादायकरीत्या लावलेल्या आहेत. या धोकादायक होर्डिंग्जमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई कधी होणार, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.