पुणे: मुंढवा ताडीगुता चौकात ट्रक वाहतुकीविरोधात चक्का जाम आंदोलन; सामाजिक कार्यकर्ते राजेश नायर यांचा पुढाकार
पुणे : गोरगरीब नागरिकांकडून वसूल होणाऱ्या घरकराच्या (टॅक्स) पैशातून शहरात नवीन रस्ते आणि उड्डाणपूल उभारले जात असताना, त्याच पुलांवरून बेकायदेशीररित्या जड वाहने धावत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
पहा व्हिडिओ
मुंढवा ताडीगुता चौक येथे अशाच एका प्रकरणावरून आज दुपारी सामाजिक कार्यकर्ते राजेश नायर यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणपुलावरून ट्रक आणि हायवा सारखी जड वाहने मोठ्या प्रमाणात विना-अनुमती व जास्त वजन घेऊन जात आहेत. या वाहतुकीमुळे पुलाच्या संरचनेला धोका निर्माण झाला असून, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज दुपारी एका बेकायदेशीर ट्रकला निळा झेंडा दाखवून थांबवण्यात आले आणि त्यानंतर नागरिकांनी पुलावरच आंदोलन सुरू केले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
राजेश नायर यांनी सांगितले, “गोरगरीबांच्या पैशातून बांधलेले रस्ते आणि पूल हे जनतेच्या सेवेसाठी आहेत, पण नियमभंग करून चालणाऱ्या जड वाहनांमुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे. अन्यथा आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू.”
या घटनेनंतर स्थानिक पोलिस आणि वाहतूक विभागाने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. मात्र, नागरिकांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.