पुणे: फसवणूक प्रकरणी TikTok स्टारला अटकपूर्व जामीन; न्यायालयाने लावल्या कठोर अटी; १ कोटींच्या परतफेडीचा आदेश

गुंतवणुकीच्या नावाखाली ९ जणांची कोटींची फसवणूक; आरोपीला अटकपूर्व जामीन सशर्त मंजूर
पुणे – साद मोटर्स या गाड्या खरेदी-विक्री व्यवसायात दरमहा २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत ९ जणांची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात TikTok स्टार मौलाना ऊर्फ अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. परंतु, न्यायालयाने सशर्त अटी घालून हा जामीन मंजूर केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने जिल्हा न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी आरोपीला १ कोटी १६ लाख ९३ हजार ५०० रुपये चार समान हप्त्यांमध्ये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
सशर्त जामीनाचा आदेश
आरोपी अब्दुल रशीद याने ३० लाख रुपये तत्काळ न्यायालयात जमा केल्यानंतर त्याचा जामीन मंजूर करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम चार महिन्यांत समान हप्त्यांमध्ये जमा करावी लागणार आहे. तसेच, आरोपीने पोलिस तपासात सहकार्य करावे, पुराव्यांत छेडछाड करू नये, साक्षीदारांवर दबाव टाकू नये आणि प्रत्येक सोमवारी सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
फिर्यादीच्या वतीने अॅड. अमेय सिरसीकर यांनी युक्तीवाद करत आरोपींचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी केली होती. परंतु न्यायालयाने गुंतवणूकदारांच्या हिताचा विचार करत आरोपीला रक्कम परतफेडीच्या अटींवर जामीन मंजूर केला.
सोनीबर खान यालाही सशर्त जामीन
या प्रकरणातील दुसरा आरोपी सोनीबर ऊर्फ सौदा रफिक खान यालाही १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याला जानेवारी २०२५ पर्यंत २० लाख रुपयांची रक्कम दोन-तीन हप्त्यांत न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
गुंतवणूकदारांच्या हितासाठी निर्णय
न्यायालयाने स्पष्ट केले की, एमपीआयडी अॅक्टच्या अंतर्गत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना नुकसान भरून देणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षा हीच पुरेशी नसून आरोपींकडून रक्कम वसूल करणे अनिवार्य आहे. अटींचा भंग झाल्यास जामीन त्वरित रद्द करण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
फसवणुकीचे प्रकरण:
साद मोटर्सच्या नावाखाली गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.