पुणे स्टेशन परिसर मोकळा, पण प्रश्न कायम – कारवाई केवळ दिखाऊ की खरोखरची सुधारणा?
पुणे : पुणे स्टेशन परिसरातील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा बुलडोझर फिरला, पण नागरिकांचा प्रश्न कायम आहे – ही कारवाई काही दिवसांची ‘डोळ्यात धूळफेक’ मोहीम तर नाही ना? पार्सल गेट परिसरात महिन्योनमहिने अतिक्रमणं फोफावत होती, प्रवाशांचा जीव अक्षरशः हैराण झाला होता, आणि प्रशासन मात्र निवांत झोपलेलं!
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाने आता मोठ्या थाटात कारवाई करून हातगाड्या, टपऱ्या, गॅस सिलेंडर, शेगड्या, टेबल-स्टूल जप्त केले आणि दोन ट्रकभर माल उचलला. पण नागरिकांच्या मनात प्रश्न — इतका काळ हे अतिक्रमण चालूच कसं राहिलं? महापालिकेचे आणि पोलीस दलाचे डोळे बंद होते का?
सार्वजनिक जागेवर बेकायदेशीर व्यवसाय उभे राहून नियमांचे उल्लंघन होत असताना संबंधित विभाग “नोटिसा दिल्या” म्हणत हात झटकत होता. आणि जेव्हा माध्यमांनी आवाज उठवला, तक्रारी वाढल्या, तेव्हा मात्र अचानक जाग आली आणि कारवाई सुरू झाली!
अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे प्रमुख संदीप खलाटे म्हणतात, “महापालिकेचा अतिक्रमणाविरोधातील मोर्चा कायम राहणार.” पण शहरातील अनुभव वेगळंच सांगतात — अशी कारवाई दोन दिवस गाजते आणि नंतर पुन्हा त्याच ठिकाणी तेच चेहरे, तेच धंदे!
प्रशासनाचं ‘अतिक्रमण निर्मूलन’ हे दरवेळीचं नाटक बनत चाललंय. कारवाईचे फोटो, बातम्या आणि निवेदने यापलीकडे कायमस्वरूपी बदल दिसत नाही.
नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे — अतिक्रमणं काढणं हे उपाय नाही, ती पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडे ‘इच्छाशक्ती’ आहे का?