पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी रस्ते सायंकाळी ५ नंतर राहणार बंद, २७ ठिकाणी पार्किंग व्यवस्था, वाचा सविस्तर
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सव आणि शहरातील गणेश मंडळांचे देखावे हे पुण्याचे खास आकर्षण असून देशभरातून तसेच परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक पुण्यात येतात. गणेशोत्सवाचा आनंद सर्व नागरिकांना निर्विघ्नपणे मिळावा यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणपती मिरवणुकीत होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील काही प्रमुख रस्ते संध्याकाळी ५ नंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक बंदी आणि पर्यायी मार्ग
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. १८) पर्यंत काही रस्ते गर्दीनुसार वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड आणि सिंहगड रस्त्यासह इतर प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवरच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले असून नागरिकांना त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतुकीस बंद असलेले काही रस्ते आणि पर्यायी मार्ग:
1. लक्ष्मी रोड: हमजेखान चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग: डुल्या मारुती चौक, दारूवाला पुल, महाराणा प्रताप रोड
2. शिवाजी रोड: गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
पर्यायी मार्ग: जे.एम. रोड, शास्त्री रोड, सिमला चौक, नेहरु रोड
3. बाजीराव रोड: पूरम चौक ते आप्पा बळवंत चौक
पर्यायी मार्ग: पूरम चौक, टिळक रोड, केळकर रोड
विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष पोलिस बंदोबस्त
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, तसेच मिरवणूक सुरक्षितपणे पार पाडावी यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, मिरवणुकीच्या वेळी खालील प्रमाणे बंदोबस्त ठेवला जाईल:
अपर पोलिस आयुक्त : ४
पोलिस उपायुक्त : १०
सहायक पोलिस आयुक्त : २३
पोलिस निरीक्षक : १२८
सहाय्यक पोलिस निरीक्षक : ५६८
पोलिस कर्मचारी : ४ हजार ६०४
होमगार्ड : ११००
राज्य राखीव पोलिस दलाची १ तुकडी, तसेच केंद्रीय सुरक्षा दल व शीघ्र कृती दलाच्या १० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पार्किंगची विशेष व्यवस्था
भाविकांच्या सोयीसाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी २७ ठिकाणी विशेष पार्किंग व्यवस्था केली आहे. प्रमुख ठिकाणांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल, शिवाजी आखाडा, एच. व्ही. देसाई महाविद्यालय, तसेच गोगटे प्रशाला, एसएसपीएमएस, स.प. महाविद्यालय, सारसबाग परिसरातील पार्किंग व्यवस्था यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने पुण्यात दाखल होणाऱ्या भाविकांची सोय लक्षात घेऊन वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषत: कार आणि दुचाकी वाहनांसाठी नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे गणेश मंडळांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्शन घेता येईल.
नो-पार्किंग क्षेत्र
शहराच्या मध्यवर्ती भागात, विशेषत: शिवाजी रोड, बाजीराव रोड आणि टिळक रोड या ठिकाणी गर्दीमुळे नो-पार्किंग व्यवस्था लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी या मार्गांवर पार्किंग टाळावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वाहतूक नियंत्रण आणि पोलिस बंदोबस्ताच्या या उपाययोजनांमुळे भाविकांना गणेशोत्सवाचा आनंद सुरक्षित आणि व्यवस्थितरित्या घेता येणार आहे.