पुणे : बिलांवरील स्वाक्षरी प्रकरणाची महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील बिलांवर सहायक आरोग्यप्रमुखांनी स्वाक्षरी केल्याच्या प्रकरणाची अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सहायक आरोग्यप्रमुखांनी आरोग्यप्रमुखांची स्वाक्षरी घेण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची माहिती सादर करण्याचे आदेश दिल्यामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध खरेदी, शहरी गरीब योजना, अंशदायी योजनेतील नागरिक आणि कर्मचाऱ्यांवरील उपचारांची खासगी रुग्णालयांची बिले दिली जातात. या बिलांच्या रक्कमेनुसार सहायक आरोग्यप्रमुख, उपआरोग्यप्रमुख आणि आरोग्यप्रमुख यांच्यामध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे.
2007 मध्ये तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी या संदर्भात आदेशपत्र जारी केले होते. त्यानुसार 30 हजार ते एक लाखांपर्यंतचे अधिकार सहायक आरोग्यप्रमुख, एक लाख ते तीन लाखांपर्यंत उपआरोग्यप्रमुख आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या बिलांवर स्वाक्षरीचे अधिकार आरोग्यप्रमुखांना दिले आहेत. परंतु, मागील वर्षभरापासून दहा लाखांपर्यंतच्या बिलांवरही सहायक आरोग्यप्रमुखांनीच स्वाक्षरी केल्याचे आढळून आले आहे.
महापालिकेने दोन वर्षांपूर्वी सर्व विभागांसाठी पारदर्शक सॅप ऑनलाइन बिलिंग प्रणाली लागू केली आहे. यासह पारंपरिक पद्धतीने बिले काढली जातात, ज्यावर आरोग्यप्रमुखांची स्वाक्षरी आवश्यक आहे. परंतु, सॅप प्रणालीतील बिलांवर मागील वर्षभरापासून आरोग्यप्रमुखांची स्वाक्षरी नसल्याचे दिसून आले आहे.
विशेष म्हणजे पारंपरिक बिले आणि सॅपमधील बिले पाठवण्यात काही दिवसांचे अंतर असल्याने महापालिका वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सहायक आरोग्यप्रमुख कोणाच्या आदेशानुसार बिलांवर स्वाक्षरी करत आहेत, आणि आतापर्यंत किती बिलांवर स्वाक्षरी केली आहे याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सहायक आरोग्यप्रमुखांना बिलांवर स्वाक्षरी करण्यास मनाई केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका आयुक्तांनी या संदर्भातील वृत्ताची गंभीर दखल घेतली असून, विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्यप्रमुखांना दिले आहेत.