पुणे: आलिशान सोसायटीत वॉचमनचा धक्कादायक प्रकार; गांजाची झाडं लावल्याचा पर्दाफाश

पुण्यात सध्या अनेक विचित्र घडामोडी घडत आहेत, ज्यामुळे “नेमकं काय चाललंय?” असा प्रश्न उपस्थित होतो. अशाच एका प्रकाराची भर नुकतीच पडली आहे. पुण्यातील एका नामांकित सोसायटीमध्ये 23 वर्षीय तरुणाने गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे.
घटना हडपसरमधील काळेपडळ येथे स्थित निर्मल टाऊनशिप या आलिशान सोसायटीमध्ये घडली. या प्रकरणात हडपसर पोलिसांनी पप्पू चुनकौना निशाद (वय 23, राहणार निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर) या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांना त्यांच्या गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, निर्मल टाऊनशिपमधील सुरक्षा रक्षक राहत असलेल्या पत्र्याच्या शेडमागे दोन गांजाची झाडे लावण्यात आली आहेत. त्यानुसार, पाच सदस्यांचे पोलीस पथक तपासासाठी त्वरित रवाना झाले.
सहायक निरीक्षक अब्दागिरे व त्यांच्या पथकाने तपास केला असता, पप्पू यांच्या शेडमागे गांजाची हिरवी झाडे आढळून आली. पोलिसांनी त्याला विचारले असता त्याने ती झाडे गांजाची असून, स्वतःच लावल्याची कबुली दिली. पोलिसांनी झाडांचे वजन मोजले असता ती 94 ग्रॅम इतकी होती.
या प्रकरणात पोलीस अंमलदार नितीन शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीबद्दल सुरक्षारक्षक पप्पू निशाद याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.