पुणे: दिव्यांग सैनिकांचा शीरखुर्मा मेळावा : पाकिस्तानवरच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष, रफीक खान म्हणाले – पुढचा उत्सव लाहोर-कराचीमध्ये साजरा करू

खडकी (पुणे) – नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सेनेने पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर खडकी येथील क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये दिव्यांग सैनिक आणि नागरिकांनी विजय उत्सव साजरा केला. या प्रसंगी राष्ट्रीय पॅरा नेमबाज आणि दिव्यांग योद्धा रफीक लतीफ खान यांच्या पुढाकाराने खास शीरखुर्मा मेजवानीचे आयोजन करण्यात आले.
या उत्सवात कर्नल वसंत भाळेश्वर यांनी उपस्थित राहून दिव्यांग सैनिकांचे अभिनंदन केले व त्यांच्या देशसेवेचे कौतुक करत विजय उत्सवाबद्दल विशेष आभार मानले.
पहा व्हिडिओ
रफीक खान यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, “ही आमच्या लष्करातील केवळ महिला अधिकाऱ्यांची कामगिरी होती, अजून पुरुष अधिकारी बाकी आहेत. पाकिस्तानने परत काही हरकत केली, तर पुढचा विजय उत्सव आम्ही लाहोर आणि कराचीमध्ये साजरा करू. पाकिस्तानने मर्यादेत राहावे.” तसेच त्यांनी समाजालाही आवाहन केले की, “दिव्यांग सैनिक हे आपल्या देशाचे अभिमान आहेत. त्यामुळे अशा आनंदाच्या क्षणी त्यांचाही समावेश समाजाने आवर्जून करावा.”
कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांची सादरीकरण दिव्यांग कलाकार निलय शाह, डेव्हिड, जबीन शेख आणि रफीक खान यांनी केली. शीरखुर्म्याचा मनमुराद आस्वाद घेत सर्वांनी विजय उत्सवाचा आनंद लुटला. या प्रसंगी दिव्यांग कलाकार मकबूल यांनी भारतीय सेनेच्या महिला अधिकारी कॉर्नल सोफिया कुरेशी यांचे लाईव्ह पोर्ट्रेट रेखाटून संस्थेला भेट दिली.
कार्यक्रमाला भाग्यश्री मोरे, आकाश कुंभार, मास्टर गाईड लाईटचे झुबैर शेख व कृपा लाजरस, राहुल मगर, एअरफोर्सचे अनिल विश्वास, झाकीर शेख तसेच अनिस डिफेन्स क्लासचे स्वयंसेवक उपस्थित होते.
हा विजय उत्सव केवळ एका युद्धाचा विजय नसून, दिव्यांगांच्या मनातील जिद्द, आत्मबळ आणि देशप्रेमाचे प्रतीक ठरला.