पुणे: खराडी दुर्घटनेनंतर शहरात शाळा वाहनांच्या कागदपत्रांची कसून तपासणी; ११ महिन्यांत ६०१ स्कूल व्हॅन दोषी, २१ लाखांचा दंड वसूल

0
IMG-20241205-WA0008-1024x575.jpg

पुणे: विधानसभा निवडणुकीची लगबग संपताच पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने स्कूल व्हॅन तपासणी मोहीम तीव्र केली आहे. खराडी परिसरात एका स्कूल व्हॅनला आग लागल्याच्या घटनेनंतर या मोहिमेची गती वाढवण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरटीओने तपासणी पथकांची संख्या वाढवली असून शहर व जिल्ह्यात तपासणी आणि कारवाई केली जात आहे.

खराडीतील दुर्घटनेतील स्कूल व्हॅनची सर्व कागदपत्रे नियमित होती. या व्हॅनचा फिटनेस परवाना ऑगस्ट २०२५ पर्यंत वैध असून पीयूसी प्रमाणपत्र २०२७ पर्यंत आहे. तरीही आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले की, शहरातील सर्व स्कूल व्हॅन आणि बस यांची तपासणी नियमित केली जात आहे. मात्र या घटनेनंतर तपासणीचा वेग आणखी वाढवण्यात आला आहे.

६०१ स्कूल व्हॅन दोषी; २१ लाखांहून अधिक दंड वसूल
आरटीओने गेल्या ११ महिन्यांत दीड हजार स्कूल व्हॅनची तपासणी केली असून यामध्ये ६०१ व्हॅन दोषी आढळल्या आहेत. या व्हॅनकडून २१ लाख ७९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. न्यायालयाने चार स्कूल व्हॅनवर कारवाई करत त्यांच्यावर अतिरिक्त दंड लावला आहे. या मोहिमेत एकूण २१ लाख ९९ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सतर्कतेचे आवाहन
पालकांनी आपल्या मुलांसाठी सुरक्षित वाहतूक साधनांची निवड करावी, तसेच स्कूल व्हॅनच्या कागदपत्रांची नियमित पडताळणी करावी, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. सुरक्षिततेसाठी वाहतूक विभागाची मोहीम सुरूच राहणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed