पुणे: ससूनचा कमला नेहरूला इशारा; “बालरुग्ण वारंवार पाठवू नका” — महापालिकेची आरोग्य यंत्रणा पुन्हा उघडी पडली!

पुणे : शहरातील आरोग्य व्यवस्थेतील निष्क्रियतेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. ससून रुग्णालयाने पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयासह अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे — “बालरुग्ण वारंवार ससूनकडे ढकलू नका.” ससूनचा हा इशारा म्हणजे महापालिकेच्या निष्काळजी आरोग्य प्रशासनावरचा थेट टोलाच मानला जात आहे.
गेल्या पंधरवड्यात शहरात न्यूमोनियाग्रस्त बालरुग्णांची संख्या वाढली, पण महापालिकेचे रुग्णालये मात्र हात टेकून बसली. कमला नेहरू रुग्णालयाकडे बालरोग विभाग असूनही मोठ्या मुलांसाठी अतिदक्षता विभाग (PICU) नाही — परिणामी लहान बाळांना थेट ससूनकडे पाठवले गेले.
ससूनवर ताण वाढला, पण महापालिका शांत!
ससूनच्या बाल अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर यांनी याबाबत महापालिकेला पत्र लिहून स्पष्ट सांगितले की, “महापालिकेने स्वतःच्या रुग्णालयात आवश्यक सुविधा तयार कराव्यात.” म्हणजेच ससूनने आता थेट महापालिकेला आरोग्यव्यवस्थेच्या अपुऱ्या क्षमतेची जाणीव करून दिली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या उपआरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी म्हटले आहे की, “यंत्रसामग्री आहे, पण डॉक्टर नाहीत.” म्हणजेच साधनसामग्री धूळ खात पडली आहे, आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे विभाग सुरू होत नाहीत. बाल अतिदक्षता विभाग २४ तास कार्यरत ठेवण्यासाठी किमान नऊ बालरोगतज्ज्ञ लागतात, पण जानेवारी २०२४ मध्ये पाठवलेला प्रस्ताव अजूनही फायलीतच अडकलेला आहे!
आरोग्य व्यवस्थेचा “डॉक्टरविना उपचार”!
शहरात लाखो रुपये खर्चून उभारलेले दवाखाने आज “डॉक्टरविना उपचार केंद्रे” बनले आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे महापालिकेच्या रुग्णालयांवर विश्वास उरलेला नाही, आणि अखेरचा भार ससूनसारख्या सरकारी रुग्णालयांवर पडतोय.
महापालिकेच्या “यंत्रसामग्री आहे पण डॉक्टर नाहीत” या निवेदनावर नागरिकांनी चोख प्रतिक्रिया दिली आहे —
“यंत्रे काम करत नाहीत, आणि अधिकारी झोपलेत; मग रुग्ण जावं कुठं?”
ससूनचा हा इशारा म्हणजे आरोग्य यंत्रणेला दिलेला “वास्तवाचा धक्का” ठरत आहे. आता पाहायचं एवढंच — महापालिका जागी होईल की आणखी एखाद्या पत्राची वाट पाहील?