पुणे: पोलिसांकडून ‘डकैती स्टाईल’ कारवाई? तरुणीला मारहाण, शिवीगाळ; ८ जणांवर गुन्हा — काय सुरु आहे नेमकं?
पुणे: पुण्यात पोलिसांच्या वर्तणुकीवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधून “बेपत्ता” तरुणी शोधण्यासाठी आलेल्या पथकाने पुण्यात अक्षरशः धिंगाणा घातल्याचा आरोप करण्यात आला असून सहा पोलिसांसह आठ जणांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. जातिवाचक शिवीगाळ, मारहाण, अवैध घुसखोरी, अपहरण, दरोडा—कायद्याचे रखवालदारच कायद्याच्या पुस्तकातील सर्व कलमे तपासण्यासाठीच पुण्यात आले होते का, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
कोथरूड पोलिस ठाण्यात तरुणीने दिलेल्या फिर्यादीत धक्कादायक आरोपांची मालिका आहे. सहायक निरीक्षक अमोल कामठे, संजीवनी शिंदे, धनंजय सानप, विनोद परदेशी, एपीआय प्रेमा पाटील, श्रुती कढणे, निवृत्त पोलिस सखाराम सानप आणि पाटील यांच्या मैत्रिणीवर गुन्हे दाखल झाले आहेत. इतक्या जणांनी एकाच तरुणीवर ‘ऑपरेशन ताबा’ राबवलं… की तिला गुन्हेगार तर समजलं, पण स्वतःच्या वर्तनाचा विचार मात्र कुणालाच आला नाही!
फिर्यादीने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरच प्रकरणाची दखल घेतली गेली. म्हणजे न्यायालयीन दरवाजावर ठोठावल्याशिवाय पोलिसांवर गुन्हा दाखल होणं आजकाल अशक्यच झालं आहे का? हा मोठा प्रश्न.
याहून गंभीर आरोप म्हणजे पथकातील काही जणांनी कपाटातून पाच हजार रुपये व सोन्याचे दागिने चोरल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणजे ज्या पथकाने ‘बेपत्ता तरुणी’ शोधायची, त्यांनीच तिच्या मैत्रिणीच्या घरात हात साफ केल्याची तक्रार आहे. हे पोलिस कारवाई होतं की अचानक उभा राहिलेला दरोडा—याचं उत्तर शोधणं अवघडच होतं आहे.
तसेच, तरुणी आणि तिच्या मैत्रिणीवर “सरकारी कामात अडथळा” या नावाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा, आणि पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ, दरोडा घातला तरी काहीच नाही—हा काय कायद्याचा नवा फॉर्म्युला?
एक विवाहित तरुणी बेपत्ता झाल्याने छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तपास केला आणि ती पुण्यात असल्याचे समोर आले. पण तिला ताब्यात घेण्याच्या नावाखाली जे काही घडतंय, ते कायद्यापेक्षा ‘बाहुबली पथकांची’ शैली अधिक वाटते.
तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. आता तरी वस्तुस्थिती बाहेर येईल की पुन्हा हा गुन्हा फक्त कागदावरच पुढे-मागे होईल? पुणेकरांना याचं उत्तर लवकरच मिळणं आवश्यक आहे.