पुणे: दिव्यांग प्रमाणपत्र फेरतपासणीसाठी आंदोलन; शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर आणून जिल्हा परिषदेसमोर ठिय्या

0
IMG_20250805_103006.jpg

पुणे, ५ ऑगस्ट – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या हलगर्जीविरोधात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी तीव्र आंदोलन छेडले. बदली प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. विशेष म्हणजे, संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची खुर्ची उचलून थेट जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर आणली आणि निषेध व्यक्त केला.

संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी सांगितले की, “जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील अनेक शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून ऑनलाईन बदली प्रक्रियेत लाभ घेतला आहे. अशा शिक्षकांची यादी आम्ही चार महिन्यांपूर्वीच शिक्षणाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, तसेच आम्हाला भेटण्यासही ते टाळत होते.”

ससून रुग्णालयाने प्रमाणपत्र फेरतपासणीस नकार दिल्यानंतर जिल्हा परिषदेने मुंबईतील जे. जे. समूह रुग्णालय, ग्रॅंट मेडिकल कॉलेज वा परिमंडळ आरोग्य उपसंचालकांच्या अधिपत्याखालील रुग्णालयातून तपासणीसाठी निर्देश दिले होते. मात्र, मुंबईतील तपासणी प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने शिक्षकांच्या बदल्या सुरूच असल्याचा आरोप संघटनेने केला.

दरम्यान, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले. “मी एका बैठकीत होतो. जे. जे. रुग्णालयाला तपासणीसाठी पत्र दिले होते. त्यांनी तपासणी शक्य नसल्याचे कळवले असून, आता आरोग्य उपसंचालकांना आणि पुन्हा जे. जे. रुग्णालयालाही विनंती केली जाणार आहे,” अशी माहिती नाईकडे यांनी दिली.

या आंदोलनात संघटनेचे महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे, पुणे जिल्हाध्यक्ष अनिता कदम, सचिव सचिन धुमाळ, बाळासाहेब काळभोर, अजित बरगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

You may have missed