पुणे: तीन महिन्यांच्या खंडानंतर प्रीपेड रिक्षा सेवा पुनश्च सुरू; प्रवाशांसाठी दिलासा: प्रीपेड रिक्षा केंद्राला जोरदार प्रतिसाद
पुणे : प्रवाशांच्या सातत्याने मागणीमुळे पुणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रीपेड ऑटो रिक्षा सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस या सुविधेसाठी प्रीपेड ऑटो रिक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत एक हजार २४९ रिक्षाचालकांनी नोंदणी केली आहे. याशिवाय १८ हजारांहून अधिक प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला असून ३१ लाखांपेक्षा जास्त व्यवहार प्रीपेड योजनेच्या माध्यमातून पूर्ण झाले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून ही सेवा बंद होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, पुणे स्टेशनवरील प्रवासी सेवा संघाचा करार संपुष्टात आल्याने ही सेवा थांबवावी लागली होती. मात्र, ही सुविधा पुन्हा सुरू केल्यामुळे प्रवाशांच्या तक्रारी व रिक्षाचालकांसोबतचे वादविवाद पूर्णतः थांबवता आले आहेत.
रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत असून प्रीपेड रिक्षा केंद्रामुळे पारदर्शकता व सुरक्षितता वाढली आहे.