पुणे: “पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; उड्या मारताना एकाचा मृत्यू”

पुणे: जुगाराची खबर मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारत पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नाना पेठेत रात्री हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. याआधी देखील सिंहगड रोड परिसरात अशाच प्रकारे पोलीस कारवाईदरम्यान उड्या मारताना एकाचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीचे नाव ब्रायन रुडॉल्फ गिअर (वय ५४, रा. बाणेर) असे आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरात पोलीस आयुक्तांच्या कठोर आदेशानंतरही काही ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या आश्रयाखाली अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. गुन्हे शाखेच्या पथकांना नाना पेठेतील क्राईस्ट चर्च समोरील लाजवंती निवास येथे पत्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार, युनिट एकचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे पथक कारवाईसाठी त्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा दरवाजा बंद असल्याने त्यांनी दार ठोठावले. एका व्यक्तीने दरवाजा उघडला मात्र पोलिसांना पाहताच पुन्हा बंद करून पोलीस आल्याचे ओरडले, ज्यामुळे संपूर्ण ठिकाणी गोंधळ उडाला.
फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर असल्याने तेथील लोक घाबरून थेट उड्या मारून पळण्याचा प्रयत्न करू लागले. काहींनी पाईपचा आधार घेतला, तर काहींनी थेट उडी मारली. त्यात ब्रायन यांनी उडी मारल्यानंतर गंभीर जखमी होऊन एक पाय फॅक्चर झाला. त्यांना तातडीने एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.
ब्रायन यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याचे समजते, परंतु त्याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. तसेच पोलिसांना फ्लॅटमध्ये कोणतेही जुगार साहित्य सापडले नाही. फ्लॅटमध्ये नेमके किती लोक होते हेही स्पष्ट झालेले नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या ठिकाणी पत्यांचा मोठा क्लब सुरू होता, जो एका प्रसिद्ध व्यक्तीशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळेच कारवाई करण्यात आली.