पुणे: कोरेगाव पार्कमधील अवैध स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक कारवाई – पोलीस निरीक्षकांची बदली; नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती– आयुक्तांचे निर्देश

पुणे – शहरातील अवैध स्पा सेंटरवर कारवाईसाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेतली असून, रहिवासी इमारतींमधील स्पा सेंटर तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरेगाव पार्क परिसरातील रहिवासी इमारतींमध्ये चालणाऱ्या स्पा सेंटरविरोधात नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी गुरुवारी (दि. 16) सायंकाळी या परिसराला भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
रहिवासी इमारतींमध्ये स्पा सेंटर आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा
रहिवासी इमारतींमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत स्पा सेंटरची तक्रार अनेक नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती. या तक्रारींना प्रतिसाद देत आयुक्तांनी कोरेगाव पार्क परिसरातील चार ते पाच लेन फिरून पाहणी केली. या वेळी त्यांनी, “रहिवासी इमारतींमध्ये स्पा सेंटर आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला.
अन्य समस्यांवरही कारवाईचे आदेश
कोरेगाव पार्क परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण, वाहतुकीची समस्या, रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेल्स आणि रस्त्यावर चालणाऱ्या गोंधळावर देखील आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले. फुटपाथ अडवून टाकलेल्या टेबल-खुर्च्या तत्काळ हटविण्याचे आदेश त्यांनी दिले.
पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक रुणाल मुल्ला यांची उचलबांगडी करून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांची प्रत्यक्ष पाहणी
गुरुवारी सायंकाळी आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरले आणि नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला. या वेळी अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना मुळीच थारा दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
कोरेगाव पार्कमध्ये पुन्हा शिस्त लावण्याची तयारी
पोलीस आयुक्तांच्या या कारवाईमुळे कोरेगाव पार्क परिसरात शिस्त आणली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अनधिकृत स्पा सेंटर आणि इतर अवैध धंद्यांवर होणारी कारवाई या परिसरातील रहिवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.