पुणे: हर्बल हुक्क्यालाही पोलिसांचा विरोध!
पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचा ठाम इशारा – नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने हर्बल हुक्क्यास परवानगी दिल्याचा आदेश दिला असला, तरी पुणे पोलिसांनी शहरात हर्बल हुक्का चालू देणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. “तंबाखूयुक्त हुक्क्यासह हर्बल हुक्काही शहरातील रेस्टॉरंट आणि पबमध्ये चालवू देणार नाही. नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी दिला.
१४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, निकोटिन किंवा तंबाखूविरहित हर्बल हुक्का विकणे कायदेशीर असल्याचे नमूद केले होते. तसेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पुण्यात स्थानिक पातळीवरील कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हर्बल हुक्क्याला परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केली.
दरम्यान, पुणे रेस्टॉरंट अँड बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. या बैठकीत ‘टू बीएचके’चे हेरंब शेळके यांनी आयुक्तांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला.
पोलिस आयुक्तांनी बैठकीत रेस्टॉरंट आणि पबचालकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यामध्ये रात्री दीड वाजता पब बंद करणे, अल्पवयीन मुलांना प्रवेश न देणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करणे आणि पार्किंगची व्यवस्था सुनिश्चित करणे, अशा सूचनांचा समावेश होता.
पोलिस आयुक्तांच्या या भूमिकेमुळे पुण्यात हर्बल हुक्क्यावरील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.