पुणे: ड्रग प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्यास बडतर्फ करणार – देवेंद्र फडणवीस
पुणे: राज्यात गुन्हेगारीत वाढ होत आहे. पॉक्सो आणि ड्रग्सच्या प्रकरणांतही वाढ दिसून येत आहे. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे गुन्हे घडतच राहणार आहेत, मात्र पोलिसांनी महिला आणि बालकांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांत कुठल्याही प्रकारचा तडजोड करु नये, असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच, अमली पदार्थांच्या गुन्ह्यात जर एखादा पोलीस दोषी आढळल्यास त्याला तत्काळ बडतर्फ केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात पुणे शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत मंजूर झालेल्या सात नवीन पोलिस ठाण्यांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, पुणे हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे केंद्र असून, येथे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. परिणामी, शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढत आहे. पोलिस दलाचा पुनर्रचना 1960 मध्ये करण्यात आला होता, परंतु जवळपास 63 वर्षांनी नवीन आकृतीबंध तयार केला गेला आहे. 2014 पासून आम्ही नवीन पोलिस ठाण्यांच्या स्थापनेसाठी काम केले आहे आणि आज पुण्यात एकाच वेळी सात पोलिस ठाण्यांचे उद्घाटन होत आहे.
गुणवत्तापूर्ण पोलिसिंगसाठी पुढाकार घेत आहोत. सीसीटीव्ही फेज 2 चे उद्घाटन करत आहोत आणि सेफ सिटीसाठी कार्यरत आहोत. नवीन कॅमेर्यांमुळे शहराच्या सुरक्षेत लक्षणीय सुधारणा होईल.
महाराष्ट्रात सायबर सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे, ज्यामुळे विविध सायबर गुन्ह्यांचे पर्दाफाश होईल. आरोपी शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. सायबर सेंटरमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व कॅमेऱ्यांचे एकत्रीकरण करण्याची आवश्यकता आहे आणि ब्लॅक स्पॉट्सवर नाईट व्हिजन कॅमेरे लावण्याचा विचार सुरु आहे.
शहरातील वाहतूक समस्यांना लक्षात घेता, पुण्यासाठी अतिरिक्त सिपी आणि एक डीसीपी नेमण्याचे नियोजन आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही पोलिस आयुक्तालयांची यंत्रणा गतिमान केली जाईल. 40 हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे आणि यामुळे पोलिस दलात कोणतीही कमतरता राहणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.