पुणे: पोलिसांचा तपास अयशस्वी: बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील आरोपी सापडत नाहीत

पुणे: बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास पोलिसांकडून जोरात सुरु आहे. याचबरोबर, घाटात नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या आणि तरुणींचा विनयभंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचीही चौकशी करण्यात येत आहे.
या बलात्कार प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल ७० पथकं उभी केली आहेत. गेल्या पंधरा दिवसात बोपदेव घाटातून प्रवास केलेल्या सुमारे तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती गोळा करण्यात आली असून, या डेटाचं तांत्रिक विश्लेषण चालू आहे.
घाटातील कमजोर मोबाइल नेटवर्कमुळे तांत्रिक तपासात काही अडचणी येत आहेत. पोलिसांना असा संशय आहे की आरोपी सासवडमार्गे पळून गेले असावेत. या भागातील ७० ते ८० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.
तांत्रिक तपासातून फारशी ठोस माहिती न मिळाल्याने पोलिसांनी पुन्हा एकदा स्थानिक खबऱ्यांचं नेटवर्क सक्रिय केलं आहे. पसार आरोपींची माहिती मिळवण्यासाठी गावातील पोलीस पाटील आणि सरपंचांची मदत घेण्यात येत आहे.
आरोपींविषयी माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, बांबू आणि इतर पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.