पुणे: स्वारगेट पाडकाम प्रकरणात पोलिसाचा हस्तक्षेप; मुख्यालयातील शिपाई समीर थोरात निलंबीत
पुणे : स्वारगेट परिसरातील बेकायदा पाडकाम प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत नवे वादळ उठले आहे. गुलटेकडीतील टीएमव्ही कॉलनीमध्ये ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेण्याच्या प्रयत्नावेळी मुख्यालयात नियुक्त असलेला पोलीस शिपाई समीर जगन्नाथ थोरात घटनास्थळी उपस्थित राहून हस्तक्षेप केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारानंतर थोरात यांना थेट सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यालयातील अधिकारी घटनास्थळी का?
मुकुंदनगरजवळील टीएमव्ही कॉलनीत तक्रारदार ज्येष्ठ नागरिकांचा दोन मजली बंगला असून, या जागेचा व्यवहार बिल्डर देवेश जैन यांच्यासोबत सुरू होता. प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असतानाही बिल्डरने घराबाहेरील भिंतीचे बेकायदा पाडकाम केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिल्डर जैन आणि त्यांच्या साथीदारांसह चौघांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात समीर थोरात हे घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलींद मोहीते यांच्या कार्यालयाकडून आलेल्या अहवालाच्या आधारे पोलीस मुख्यालयाच्या उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी त्यांचे निलंबनाचे आदेश दिले.
याआधीही निलंबनाची कारवाई
याच पाडकाम प्रकरणात यापूर्वी स्वारगेट पोलीस ठाण्यातील कर्मचारी विजय नामदेव शिंदे यांनाही निलंबित करण्यात आले होते. शिंदे हे घटनेच्या वेळी बंदोबस्तासाठी नेमलेले असतानाही ते अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीत जेसीबीद्वारे कंपाऊंड आणि लोखंडी गेट तोडण्यात आले होते. त्यानंतर उपायुक्त मिलींद मोहीते यांनी शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते.
शहरात चर्चेला उधाण
मुख्यालयात नियुक्त असलेला कर्मचारी प्रत्यक्ष पाडकामाच्या ठिकाणी उपस्थित राहणे आणि हस्तक्षेप करणे या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन पोलिसांच्या निलंबनानंतर वरिष्ठांकडून संपूर्ण चौकशीची मागणी होत आहे.