पुणे: परिमंडळ चारमध्ये पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक : २२ अवैध दारूधंद्यांवर कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे : शहरातील येरवडा, वाघोली, लोणीकंद, विश्रांतवाडी आणि चंदनगर या भागांचा समावेश असलेल्या परिमंडळ चार परिसरात अवैध हातभट्टी दारू आणि बेकायदा देशी-विदेशी मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सलग दुसऱ्या आठवड्यात करण्यात आली.
या विशेष मोहिमेत ३१ पोलिस अधिकारी आणि ७२ पोलिस अंमलदार अशा एकूण शंभरहून अधिक पोलिसांचा सहभाग होता. एकाचवेळी विविध ठिकाणी छापे टाकत पथकांनी २२ ठिकाणी अवैध मद्यनिर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले. या कारवाईत २ लाख ९२ हजार रुपयांचा मद्यसाठा आणि साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे.
अवैध दारूधंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी पुकारलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे स्थानिक नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून काही भागांमध्ये खुलेआम हातभट्टी दारू आणि बेकायदा मद्य विक्री सुरू होती. त्यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत होते.
पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अवैध दारूधंद्यांवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही. कारवाईचा झडप येत्या काळातही सुरूच राहणार आहे.”
परिमंडळ चारमधील पोलिसांची ही आक्रमक भूमिका पाहता, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनाही पोलिसांच्या या धडक मोहिमेचा सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील काळात असे धंदे मूळापासून नष्ट होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.