पुणे: गस्त घालणारेच लुबाडू लागले; दोन पोलीस अंमलदार निलंबित

police_fired-1.jpg

पुणे | प्रतिनिधी
नागरिकांच्या सुरक्षेचे वचन देणाऱ्या पोलीस खात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन अंमलदारांनी रात्री गस्त घालण्याऐवजी सामान्य नागरिकांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दोन्ही अंमलदारांना तत्काळ निलंबित केल्याचे सुत्रांकडून समजते.

कोण आहेत हे पोलिस?
निलंबित अंमलदारांची नावे गणेश तात्यासाहेब देसाई आणि योगेश नारायण सुतार अशी आहेत. देसाई यांना १७ जून रोजी रात्रपाळीसाठी मोबाईल व्हॅनवर वाहनचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते, तर सुतार हे बालगंधर्व बीट मार्शल म्हणून कार्यरत होते.

लोकांकडून पैशांची उघड वसुली
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेतली असता, तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, तो आणि त्याची मैत्रीण लॉ कॉलेज रोडवरील दामले पथ येथे कारमध्ये थांबले होते. त्यावेळी देसाई आणि सुतार हे दोन पोलीस तेथे आले. ‘या परिसरातून तुमच्याविरुद्ध तक्रार आली आहे, म्हणून चौकीत चला किंवा पैसे द्या,’ असा दबाव त्यांनी आणला. चौकीची भीती दाखवून त्यांनी २० हजार रुपये मागितले.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, देसाई याच्या दुचाकीवर मागे बसून ते कमला नेहरू पार्क येथील एटीएममध्ये गेले आणि तिथून पैसे काढून अंमलदारांना दिले. त्यानंतर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता त्यांना तिथेच सोडण्यात आले.

कर्तव्याला तडा; पोलिस खात्याची प्रतिमा मलिन
गुन्ह्याचा तपास, जनतेचे संरक्षण आणि कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य असताना या अंमलदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करत नागरिकांची लुबाडणूक केली. ही बाब उघडकीस येताच, उपायुक्त पिंगळे यांनी कोणतीही ढिलाई न करता दोघांनाही निलंबित केले आहे.

पोलीस दलाची विश्वासार्हता डागळली
या घटनेमुळे पोलीस दलातील शिस्त आणि जनतेचा विश्वास यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूला पोलीस प्रशासन गुन्हेगारी रोखण्यासाठी झटत असताना, दुसरीकडेच काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या अशा गैरकृत्यांमुळे विभागाची विश्वासार्हता डागाळली जात आहे.

या प्रकाराची सखोल चौकशी सुरु असून, दोन्ही अंमलदारांवर पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Spread the love

You may have missed