पुणे: एक मजला, पण कर चार मजल्यांचा! ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयचा अजब कारभार उघड; पाच वर्षे हेलपाटे, तरीही कर दुरुस्ती नाही – महापालिकेच्या दिरंगाईचा बळी

पुणे : प्रतिनिधी
महापालिकेच्या मिळकतकर विभागाने एक मजल्याच्या घरासाठी थेट चार मजल्यांचा कर लावल्याचा अजब प्रकार उघड झाला आहे. परिणामी, साधारण सुतारकाम करणाऱ्या घरमालकाच्या मिळकतकराची रक्कम थेट ४३ लाख रुपयांवर पोहोचली आहे. तब्बल पाच वर्षे प्रशासनाच्या दारात हेलपाटे घालूनही दखल न घेतल्यामुळे अखेर प्रशासनाने कर दुरुस्त करण्याची तयारी दाखवली, पण त्यासाठी आधी १७ लाख ५० हजार रुपये भरण्याची अट ठेवण्यात आली आहे.
हा प्रकार मुंढवा येथील शिर्के रस्त्यावरील रहिवासी सुरेश सरवदे यांच्या बाबतीत घडला आहे. सरवदे यांनी दीड गुंठ्याच्या जागेवर १३०० चौरस फूट क्षेत्रफळाचे एकमजली घर बांधले. त्यांनी महापालिकेकडे मिळकतकरासाठी अर्ज केला असता, कार्यालयाने चक्क चार मजले असल्याचे नोंदवून त्यांना जास्तीचा मिळकतकर पाठविला.
या चुकीच्या नोंदीला विरोध करत सरवदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रत्यक्षात अधिकाऱ्यांना जागेवर नेऊन वस्तुस्थिती दाखवूनही महापालिका दुर्लक्ष करत राहिली. दरम्यान, २०१७ साली कर न भरल्यामुळे त्यांना तब्बल ५.५ लाख रुपयांचे बिल पाठवण्यात आले.
पाच वर्षे सतत विनंत्या करूनही नुसती आश्वासने मिळाल्याने अखेर सरवदे यांनी मिळकतकर विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे दाद मागितली. सध्या प्रशासनाने चौकशीची तयारी दाखवत संबंधित अधिकाऱ्यांसह तक्रारदाराला बोलावून घेतले आहे.
उपायुक्त सकपाळ यांनी सांगितले की, “एक मजल्याच्या घरासाठी चार मजल्यांचा कर लावल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. कागदपत्रांची तपासणी करून योग्य निर्णय घेतला जाईल.”
महापालिकेच्या एका चुकीमुळे सामान्य नागरिकाला लाखो रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. अशा अकार्यक्षम प्रशासनामुळे नागरिकांची हेळसांड होत असून, वेळेत दुरुस्ती न झाल्यास आणखी नागरिक संकटात सापडू शकतात, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.