पुणे: कार्यालय रिकामं, अधिकारी पार्टीत व्यस्त ! ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता विभागाचा गंभीर प्रकार उघड

0
IMG_20250605_103711.jpg

पुणे | प्रतिनिधी शासनाच्या वेळेत नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी (दि. २ जून) सकाळी एका हॉटेलमध्ये पार्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

“दैनिक पुढारी” ने दिलेल्या वृत्तानुसार, आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अनेक नागरिक सकाळपासूनच आपल्या समस्या घेऊन कार्यालयात पोहोचले होते. मात्र, अभियंता विभाग पूर्णपणे रिकामा असल्याचे चित्र होते. उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, कर्मचारी आणि ठेकेदारांसह जवळपास २५ जण घोले रोडवरील एका हॉटेलमध्ये पार्टी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या पार्टीचे बिल एका ठेकेदाराने भरल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते की नाही, याची चौकशी करावी आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.

“मी सकाळी ११ ते १२ या वेळेत अभियंता विभागात गेलो. मात्र, एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी गेलो, तर तेही कार्यालयात नव्हते.”
– जॉन्सन कोल्हापुरे, नागरिक

या प्रकरणाबाबत विचारणा केली असता, सहायक आयुक्त सदानंद शिंपी यांनी पार्टीबाबत अज्ञानता व्यक्त केली. उपअभियंता अशोक झुळूक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

“कार्यालयीन वेळेत अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना जर कर्मचारी अनुपस्थित आढळले, तर त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.”
– माधव जगताप, उपायुक्त, पुणे महापालिका

ही घटना सरकारी यंत्रणेतील बेजबाबदारी दर्शवणारी असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी, अशी नागरिकांची मागणी आहे.


Spread the love

Leave a Reply

You may have missed