पुणे : राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरेंनी कुख्यात गुंड गजा मारणेची वाढदिवसाला घेतली भेट, व्हिडीओ तुफान व्हायरल

पुणे : कुठल्याही गुंडांशी संबंध नकोत, म्हणून अजितदादांनी भरली होती तंबी, पण ती त्यांच्याच कार्यकर्त्यांनी खुंटीला टांगली असे पुण्यात घडले.
त्याचे झाले असे :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांनीही मागे गजा मारणेची भेट घेतली होती. त्यावेळी या भेटीची बातमी आल्याबरोबर अजित पवारांनी इथून पुढे असे घडायला नको, अशी आपल्या कार्यकर्त्यांना तंबी दिली होती. पण त्यानंतर शरद पवार गटाचे नेते आणि नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनीही भेट घेतली. तो गुंड असल्याचे आपल्याला माहिती नव्हते, असे नंतर निलेश लंके यांनी कानावर हात ठेवले होते.
पण अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना अशी तंबी देऊन काहीच फायदा झाला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गजानन मारणेसोबत व्हिडीओ टाकत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या व्हिडीओची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.
पार्थ पवार यांनी गजानन मारणेची भेट घेतल्यावर अजित पवार यांनी आपण त्याला विचारणा करणार असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नाहीतर पुन्हा असे अजिबात घडता कामा नये, असं म्हणत अजित पवारांनी मुलाला फटकारलं होतं. मात्र आता त्यांच्याच महिला नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी गजानन मारणेसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये रूपाली ठोंबरे गजा मारणेचा सत्कार केल्याने अजितदादांच्या तंबीला कार्यकर्त्यांनी खुंटीवर टांगल्याची खिल्ली सोशल मीडियात उडवली गेली.
‘गजानन मामा आपणास जन्म दिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा’, असं कॅप्शन देत रूपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड गजा मारणेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांची ओळख परेड घेत प्रत्येकाला दम भरला होता तरीदेखील गजानन मारणेच्या समर्थकांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वर त्याची पेजेस तयार करून पोलिसांचाही दम बाजूला ठेवला होता.
या पार्श्वभूमीवर आता अजित पवार रूपाली ठोंबरे संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.