पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून ‘त्या’ प्रकरणाची गंभीर दखल; सहाय्यक आरोग्य अधिकार्‍यांना बिलांवर स्वाक्षरी करण्यास मनाई केली

0

महापालिका आयुक्तांचे विस्तृत अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाला आदेश

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बिलांवर सहाय्यक आरोग्य प्रमुखांकडून स्वाक्षर्‍या करण्यात येणार्‍या प्रकरणाची अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. सहाय्यक आरोग्य प्रमुखांनी या बिलांवर आरोग्य प्रमुखांची स्वाक्षरी घ्यावी, असे आदेश दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी देखिल याप्रकरणाची माहिती सादर करण्याचे आदेश दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध खरेदी, शहरी गरीब योजना, अंशदायी योजनेतील नागरिक आणि कर्मचार्‍यांवरील उपचारांची खाजगी रुग्णालयांची बिले देण्यात येतात. ही बिले देताना रकमेनुसार सहाय्यक आरोग्य प्रमुख ते आरोग्य प्रमुख असे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. २००७ मध्ये तत्कालीन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी यासंदर्भातील आदेशपत्रही काढले आहे. त्यानुसार ३० हजार ते एक लाख पर्यंतचे अधिकार सहाय्यक आरोग्य प्रमुख, एक लाख ते तीन लाखांपर्यंत उपआरोग्य प्रमुख तर त्यावरील बिलांवर स्वाक्षर्‍यांचे अधिकार आरोग्य प्रमुखांना दिले आहेत.

परंतू मागील वर्षभरापासुन अगदी दहा लाखांच्या बिलांवरही सहाय्यक आरोग्य प्रमुखच स्वाक्षर्‍या करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील दोन वर्षांपासून महापालिकेने सर्वच विभागांसाठी पारदर्शक ठरणारी ‘सॅप’ ही ऑनलाईन बिलिंग सिस्टिम आणली आहे. यासोबतच पारंपारिक पद्धतीने बिले काढली जातात. पारंपारिक पद्धतीने काढल्या जाणार्‍या बिलांवर आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या जातात. परंतू सॅप सिस्टिमधील बिलांवर मागील वर्षभरापासून आरोग्य प्रमुखांची स्वाक्षरी नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष असे की पारंपारिक बिले आणि सॅपमधील बिले पाठविण्यामध्ये काही दिवसांचे अंतर राहात असल्याने महापालिका वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर सोमवारी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सहाय्यक आरोग्य प्रमुख कोणाच्या आदेशानुसार बिलांवर स्वाक्षर्‍या करत आहेत, आतापर्यंत किती बिलांवर स्वाक्षरी केली आहे, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी सहाय्यक आरोग्य प्रमुखांना बिलांवर स्वाक्षरी करण्यास मनाई केली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेतली असून विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य प्रमुखांना दिले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed