पुणे महानगरपालिकेत महिला अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई : दोन जणांना प्रवेशबंदी

0
n6673449361749273292824018df0e35e72478289a333f49826a1ae1c9804e5f27b52ace921a79d103a5d4c.jpg

पुणे | दि. ६ जून २०२५ : महिला आरोग्य अधिकाऱ्यांना धमकावणे, अर्वाच्च भाषा वापरणे व कार्यालयीन कक्षात गोंधळ घालणे यांसारख्या घटनांमुळे पुणे महानगरपालिकेने कठोर पावले उचलली असून, दोन व्यक्तींवर कार्यालयीन परिसरात प्रवेशबंदी घोषित करण्यात आली आहे.

दि. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सी.एच.एस. विभागात घडलेल्या प्रकारामुळे, अंतर्गत लैंगिक अत्याचार प्रतिबंध समितीकडून सखोल चौकशी करण्यात आली. समितीच्या शिफारशीनुसार महापालिका प्रशासनाने श्री. ओंकार कदम व श्री. अक्षय कांबळे या दोन व्यक्तींसह अन्य अज्ञात संबंधितांनाही महापालिकेच्या मुख्यालयासह इतर सर्व कार्यालयांमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी लावली आहे.

तक्रारीनुसार, संबंधितांनी महिला अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय चित्रीकरण केले, अर्वाच्च भाषा वापरून धमकावले आणि मानसिक त्रास दिला. त्यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळविरोधी कायद्यानुसार (२०१३) ही बाब गंभीर स्वरूपाची मानण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हे परिपत्रक जारी करून प्रशासनाच्या कर्मचारी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रवेशबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास, संबंधित सुरक्षा रक्षकांनी तत्काळ कारवाई करून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत.

या कठोर निर्णयामुळे प्रशासनातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत सकारात्मक पाऊल उचलले गेले असून, अशा घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed