पुणे: महापालिका अनधिकृत जाहिराती हटवण्यात अपयशी; निवडणुकीच्या घोषणेनंतरही फ्लेक्स कायम
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर महापालिकेच्या वतीने शहरभर लावलेले अनधिकृत राजकीय फ्लेक्स आणि जाहिराती तत्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, बुधवारी रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी हे अनधिकृत फ्लेक्स आणि जाहिरात बोर्ड उभे असल्याचे दिसून आले. यामुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वीच अनधिकृत जाहिराती हटवण्याचे लेखी आदेश जारी केले होते. मात्र, अद्याप कार्यवाही न झाल्याने अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित विभागास पुन्हा आदेश दिले आहेत. दोन दिवसांत संपूर्ण शहरातील अनधिकृत जाहिराती काढण्याचे निर्देश दिले आहेत.
विधानसभा निवडणुका जाहीर होताच, अनेक इच्छुक उमेदवारांनी शहरातील विविध मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात फ्लेक्स आणि जाहिराती लावल्या होत्या. हे फ्लेक्स अनधिकृत असूनही, महापालिकेने त्यांच्यावर तातडीने कारवाई केली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीही महापालिकेस पत्र पाठवून निवडणुकीच्या संभाव्य घोषणेनंतर अशा जाहिरात फलक काढण्याचे आदेश दिले होते.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी दुपारपर्यंत शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स हटवले जातील असे आश्वासन दिले आहे.