पुणे: उंड्रीतील चौदा मजली इमारतीत भीषण आग; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, पाच जखमी

IMG_20250927_105458.jpg

पुणे : उंड्री परिसरातील जगदंब भवन मार्गावरील मार्वल आयडियल सोसायटीच्या चौदा मजली इमारतीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागून एकाचा मृत्यू व पाच जण जखमी झाले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाराव्या मजल्यावरील एका सदनिकेत लागलेली आग अल्पावधीतच विक्राळ रूप धारण करत संपूर्ण इमारतीला जखडून टाकली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पाच वाहने व एक उंच शिडीचे वाहन तातडीने दाखल झाले. जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे दोन जवान व तीन नागरिक जखमी झाले, तर एका १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सध्या आग नियंत्रणात आणण्यात आली असून अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. पोलिस व महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

या घटनेमुळे उंच इमारतींमधील अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Spread the love