पुणे : गणेशोत्सव काळात मंडळांनी जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, सीनियर पी आय रवींद्र शेळके यांचा गणेश मंडळांना आव्हान
पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी गणेश मंडळांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. त्यांनी समाज प्रबोधनासाठी देखावे सादर करण्याचे आवाहन केले असून, जबरदस्तीने वर्गणी गोळा न करण्याची सूचना केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पत्ते खेळणे, दारू पिण्याचे प्रकार टाळावेत, तसेच मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करताना, विसर्जन मिरवणुकीत डिजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मंडपाच्या आकाराबाबतही खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्त्याच्या रुंदीच्या एक तृतीयांशापेक्षा मोठा मंडप लावू नये आणि मंडपाच्या स्टेजच्या मजबुतीचे प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी मंडपवाल्यांवर सोपवण्यात आली आहे. आग प्रतिबंधक उपाययोजना, जनरेटरची सोय, तसेच ध्वनिक्षेपकाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गणेश मंडळांनी सामाजिक भान राखून उत्सव साजरा करावा, असा संदेशही त्यांनी दिला. अनावश्यक खर्च टाळून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करावे, गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा, रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण हे उपक्रम राबवून उत्सव साजरा करण्याचे आवाहन शेळके यांनी केले आहे.