पूणे: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई; डॉ. घैसास यांच्यावर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सूट

ससून रुग्णालयाचा नव्याने अहवाल
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिसे यांच्यावर उपचारात दिरंगाई केल्याचा आरोप घैसास यांच्यावर आहे.
पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रसुतीनंतर तनिषा भिसेंचा मृत्यू गेल्या महिन्यात २८ मार्चला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा यांच्यावर उपचार करण्यास नकार दिल्यामुळे आणि त्यासाठी विलंब केल्यामुळे झाल्याचा आरोप आहे.
भिसे यांच्या कुटुंबाकडून घैसास यांनी दहा लाख रूपयांची आगाऊ मागणी केल्यानंतर ही आगाऊ रक्कम दिल्याशिवाय तनिषा भिसे यांच्यावर उपचार करणार नाही असं रुग्णालयानं सांगितल्याचा आरोप आहे. मात्र, भिसेंच्या कुटुंबाकडं एवढी रक्कम नसल्यानं त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं.
यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची प्रसुती झाली. परंतु, नाजूक अवस्थेत असलेल्या तनिषा यांचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळं पैसे भरल्याशिवाय उपचार करणार नाही असं म्हणणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत राजकीय पक्ष तसंच विविध संघटनांनी रुग्णालया बाहेर आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर तनिषा भिसे यांच्या मृत्यूबाबत आरोग्य विभाग उपसंचालक, धर्मादाय सहआयुक्त समिती आणि मातामृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनामत रकमेअभावी उपचार न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळं भिसेंच्या नातेवाइकांनी त्याबाबत अलंकार पोलिसांकडं तक्रार नोंद करून जबाब नोंदवले आहेत.
अलंकार पोलिसांनी भिसे कुटुंबीयांसह दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या रुग्णालय, मणिपाल रुग्णालय आणि इंदिरा आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर या सर्व ठिकाणचे संबंधितांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. याची सर्व माहिती आणि जबाब पोलिसांनी ससूनच्या मेडिकल बोर्डाकडं सुपूर्त करत या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा झाला आहे का? याबाबत मत देण्याची विनंती रुग्णालयाला केली. यानुसार समितीनं दोन दिवसांपूर्वी अहवाल पोलिसांकडं सादर केला. यानंतर शनिवारी डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ससूनच्या अहवालात काही शंका असल्यानं हॉस्पिटलकडून परत अहवाल मागवला. यात डॉ. घैसास यांनी भिसेंवर उपचार करण्यात निष्काळजीपण आणि हलगर्जी केली. त्यांनी वेळ वाया घालवला. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या अहवालानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉ. घैसास याचा रोल या प्रकरणात दिसत आहे, त्यानुसार ही कारवाई केली आहे. या प्रकरणी डॉ. घैसास यांचा जबाब घेतला जाईल,’ असं पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.