पुणे : कुंजीरवाडी येथे आर.टी.ओ.च्या अधिकाऱ्याच्या चारचाकीने दुचाकीवरील दोन तरुणांना धडक दिल्याची सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
लोणी काळभोर : पुणे येथील हिट अँड रन प्रकरण देशभरात चर्चेत असतानाच जिल्ह्यातील पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवत दुचाकीला धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कुंजीरवाडी गावातील चौकात बुधवारी (ता.३) सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास वरील अपघात झाला आहे. या अपघातात लोणी काळभोर येथील एक, तर कुंजीरवाडी येथील एक असे दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
संभाजी गावडे हे त्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव आहे. या अपघातात निखिल बाळासाहेब पवार (वय -26, राहिंज वस्ती, लोणी काळभोर) व विकास नामदेव राठोड (वय-32, वायकर वस्ती, कुंजीरवाडी) हे दोन तरुण जखमी झाले आहेत. दोघांवरही लोणी काळभोर येथील विश्वराज या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान सदर अपघाताचे सिसीटीव्ही फुटेज “पुणे प्राईम न्यूज” च्या हाती लागले आहे.
व्हिडिओ पाहण्याकरिता खालील फोटोवर क्लिक करून पुन्हा 30 सेकंद नंतर एकदा क्लिक करा.
या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे संभाजी गावडे यांनी दोन्ही जखमींच्या नातेवाईकांना उपचाराचा खर्च देण्याचे आमिष दाखवत वरील अपघाताचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल होऊ दिला नव्हता. तर दुसरीकडे “साहेब” खर्च देणार असल्याने, नातेवाईकांनीही अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास उत्सुकता दाखवली नव्हती. मात्र, दोन्ही रुग्णांच्या शस्त्रक्रियांचा खर्च देण्यास साहेबांनी ऐनवेळी हात वर केल्याने, निखिल पवार व विकास राठोड या दोघांना उपचार संपल्यावरही मागील तीन दिवसांपासून रुग्णालयातच खितपत पडावे लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे. साहेबांकडून जखमी झालेले दोन्ही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अवस्था गंभीर बनली आहे.
अपघातातील जखमींकडुन मिळालेल्या माहितीनुसार, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कदमवाकवस्ती येथील मुक्काम आटोपून बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचनच्या दिशेने मार्गस्थ झाला. या पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून प्रशासनाच्या वतीने थेऊर फाटा येथे नाकाबंदी करून मार्ग वळविला होता. तसेच सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद केली होती. त्याच दरम्यान संभाजी गावडे हे त्यांच्या कुटुंबासोबत सोलापुरच्या दिशेने जात होते. थेऊरफाटा येथील पोलिसांनी सुरुवातीला गावडे यांच्या वाहनाला पुढे जाण्यास मज्जाव केला. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाचे वरीष्ठ अधिकारी असल्याचे सांगितल्याने, तेथील वाहतूक पोलिसांनी संभाजी गावडे यांना थेऊर फाटा येथून उरुळी कांचन बाजूकडे जाण्यासाठी वाट करुन दिली.
संभाजी गावडे यांची इनोवा गाडी भरधाव वेगात उरुळी कांचनकडे जात असताना कुंजीरवाडी चौकात निखिल पवार व संभाजी गावडे हे दोघे प्रवास करत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात निखिल पवार व संभाजी गावडे हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना लोणी काळभोर येथील एका बड्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्याचा मित्र असलेल्या लोणी काळभोर परीसरातील एका स्थानिक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला. या नेत्याने गुन्हा दाखल करू नका, तुम्हाला उपचाराचे बिल द्यायला सांगतो, असे रुग्णांना सांगितले. त्यामुळे दोन्ही तरुणांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही.
या अपघातात जखमी झालेल्या निखिल पवार यांच्या खांद्याचे हाड तुटले होते. त्यांच्यावर हाडाची व पायाच्या अस्थीरज्जूची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी सुमारे २ लाख ८५ हजार रुपये एवढा खर्च आला आहे. तर विकास राठोड यांच्या पायाच्या मांडीचे हाड तुटले होते. त्यांच्या पायामध्ये रॉड टाकण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना २ लाख ५ हजार रुपयांचे बिल आले आहे. दरम्यान संबंधित अधिकाऱ्याने रुग्णांना दवाखान्यात दाखल करतेवेळी सुमारे १ लाख १० हजार रुपये बिल दिल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान गावडे यांनी निखिल पवार व विकास राठोड यांच्या उपचारापोटी काही रक्कम भरल्याचा दावा केला असला, तरी दोघांवर झालेल्या उपचाराचे उर्वरित बिल न दिल्याने, उपचार संपल्यानंतरही निखिल पवार व विकास राठोड हे मागील दोन दिवसांपासून रुग्णालयात अडकून पडले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून काही रक्कम रुग्णांना मिळणार आहे. ते बिल मिळाल्यानंतर रुग्णांना डिस्चार्ज मिळणार आहे. मात्र, अधिकाऱ्याच्या मुजोरीमुळे सध्यातरी रुग्ण दवाखान्यात अडकले आहेत. तसेच रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर तीन महिने तरी काम न करता घरीच आराम करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने लवकर दवाखान्याचा खर्च द्यावा, अशी मागणी दोन्ही रुग्णांनी केली आहे.
याबाबत “पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना निखिल पवार व विकास राठोड म्हणाले, संभाजी गावडे यांच्या चुकीमुळे घडलेल्या अपघातात आम्ही दोघे गंभीर जखमी होऊनही, त्यांच्या नोकरीचा व प्रतिष्ठेचा विचार करुन आम्ही लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली नव्हती. तक्रार दाखल होऊ नये, यासाठी गावडे यांनी एका स्थानिक राजकीय नेत्यांच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधला होता. आम्हा दोघांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च भरण्याचे आश्वासनही आम्हाला दिले होते. तसेच सुरुवातीला काही रक्कमही जमा केली होती. मात्र, भरलेल्या रकमेच्या चारपट उपचाराचा खर्च आलेला आहे. ती रक्कम आमच्याकडे नसल्याने, आमच्यावरील उपचार संपूनही मागील तीन दिवसांपासून रुग्णालयात आम्ही अडकून पडलो आहोत. बिलाची रक्कम भरण्यासाठी केलेले फोनही गावडे उचलत नसल्याने, आमची अवस्था गंभीर बनली आहे. आमच्या दोघांचीही आर्थिक परीस्थिती बेताचीच असल्याने, बिल भरणे शक्य होणार नाही.
दरम्यान घडलेल्या घटनेबाबत बोलताना प्रादेशिक परिवहनचे अधिकारी संभाजी गावडे म्हणाले, अपघाताची घटना खरी आहे. दोन्ही जखमींच्या उपचाराचे बिल मध्यस्थाकडे जमा केल्याने, माझ्याकडून वरील अपघाताचा विषय संपला आहे. बाकी अपघातातील जखमीचे रुग्ण पाहतील, असे म्हणत गावडे यांनी विषय बंद केला.