पुणे: महाराष्ट्रासह २० राज्यांत पुन्हा पावसाचा जोर, हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

0



पुणे:  सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रासह देशभरात चांगला पाऊस झाला होता. मात्र, मागील आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली होती, ज्यामुळे तापमान वाढले आणि उन्हाचा चटका बसत होता. आता, बंगालच्या उपसागरातील खोल दाबामुळे पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत.

भारतीय हवामान विभागाने २० राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुराच्या काही भागांचा समावेश आहे. तसेच, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि ईशान्य भारतातील इतर भागांमध्येही २० सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस कोसळणार आहे. मुंबई आणि उपनगरातही ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. पुण्यासह परिसरातही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पूर्व भारतात अतिवृष्टीचा कहर

पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारीही या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशात पावसाचा अलर्ट

दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात पुन्हा हवामान बिघडण्याची शक्यता आहे. शिमला हवामान केंद्राने १८ सप्टेंबरपासून राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. कांगडा, कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed