पुणे: तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी गणेश लोंढेंचा पुढाकार
पुणे : शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत बेरोजगार युवक-युवतींना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पुण्यात उद्योजकता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्र आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे गणेश लोंढे यांच्या पुढाकाराने हे शिबीर आयोजित करण्यात आले असून, युवक-युवतींसह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी अजूनही शासकीय योजना दलित वस्ती, झोपडपट्टी आणि गावांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गणेश लोंढे यांनी पुढाकार घेत, राज्यभर बेरोजगारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी उद्योजकता प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली आहेत. याच धर्तीवर पुणे शहरातही शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये युवक-युवती आणि महिलांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
शिबीरात सहभागी झालेल्यांना शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा याची माहिती देण्यात आली. याशिवाय, शासकीय महामंडळे आणि जिल्हा उद्योग केंद्राशी समन्वय साधून युवक-युवतींना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. रोजगाराच्या संधी कमी असल्याने युवक-युवतींनी स्वतःचा व्यवसाय सुरु करून आत्मनिर्भर होण्याची गरज आहे, असे लोंढे यांनी आवाहन केले.
पुण्यातील शिबीरात उद्योग केंद्राचे विभागीय अधिकारी अभिराम डुबीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल पाटील यांनी सुशिक्षित बेरोजगारी आणि महिला सबलीकरण या विषयांवर मार्गदर्शन केले. या शिबीरात रासपचे अॅड. संजय माने, लहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे, अभिनेते सुजित रणदिवे, अॅल्ड पौर्णिमा कोलते, अनिल जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.